(Image Source : Internet)
बीड :
बीड (Beed) जिल्हा कारागृहात सकाळी झालेल्या कैद्यांमधील दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यान वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.
वाल्मिक कराडचा कारागृहात वाद झाल्याचे मला कळाले. प्रशासन सांगताना वेगळी नावं सांगत आहे. पण दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मला आहे. त्यांनी या मारहाणीमागे महादेव गिते आणि अक्षय आठवलेअसल्याचे स्पष्टपणे म्हटले. धस यांच्या मते, महादेव गिते याला बापू आंधळे हत्या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचा राग या मारहाणीमागे आहे. महादेव गिते याने अटक होण्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे. इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचे… अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाली असेल,असे धस म्हणाले.
फार मोठी मारहाण नाही पण अंगावर धावाधावी झाली… फक्त मारहाण झालेली आहे. कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेले नाही, असे म्हणत त्यांनी वाल्मिक कराडला फक्त दोन कानशिलात लगावल्याचे आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. सुरेश धस यांनी यावेळी तुरुंग प्रशासनावर आणि पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. माझ्याकडे अशी माहिती आहे की, आकांना (वाल्मिक कराडला उद्देशून) जेलमध्ये स्पेशल ट्रिटमेंट दिली जाते . त्यांना चांगलं जेवण आणि फोन दिला जातो. मला तर असं पण कळाले की, त्यांच्याकडे असा कोणतातरी फोन आहे, जो डायरेक्ट परळीतील फोनला फोन लागतो, असा खळबळजनक आरोप धस यांनी केला.
दरम्यान तुरुंगात दोन्ही गट एकत्र येऊ देणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अमरावती किंवा नागपूर येथील तुरुंगात हलवण्याची जोरदार मागणी केली.