तुळजाभवानीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून 1 कोटींचे दान, 100 ग्रॅमची 11 बिस्किटे देवीला अर्पण

29 Mar 2025 15:25:35
 
Tulja Bhavani goddess
 (Image Source : Internet)
तुळजापूर :
तुळजाभवानी (Tulja Bhavani) महाराष्ट्राची कुलदेवी असून दररोज लाखो भक्त देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडील भक्तदेखील देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात. भक्त देवीच्या चरणी भरभरून दान करत असतात. देवीच्या चरणी एका अज्ञात भक्ताने तब्बल 1 कोटी रुपयांचे दान अर्पण केले आहे.
 
तुळजाभवानीला १ किलो सोन्याच्या ११ बिस्किटांचे गुप्तदान करण्यात आले असून प्रत्येक बिस्किट 100 ग्रॅमचे आहे. मंदिरातील दानपेट्या उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत एका अज्ञात भाविकाने १ किलो १०० ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची ११ बिस्किटे अर्पण केली आहेत. प्रत्येक बिस्किटाचे वजन १०० ग्रॅम आहे.
 
शुक्रवारी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या तेव्हा भाविकाने अर्पण केलेले सोन्याचे बिस्किट चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्र.२ मध्ये आढळून आली. प्रत्येक बिस्किटावर १०० ग्रॅम तसेच ९९९ लिहिले आहे. शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर ९२ हजार रुपये होता. त्यानुसार या ११ बिस्किटाची किंमत सुमारे १ कोटी १ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
Powered By Sangraha 9.0