वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

29 Mar 2025 19:47:31
 
Tiger dog monument
 (Image Source : Internet)
मुंबई :
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून (Tiger dog monument) मोठा वाद पेटला आहे. संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते असा दावा केला आहे. तर होळकरांच्या वंशजांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
रायगडावरील वाघ्या कुत्र्‍याची समाधी हटवा अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली होती. त्यांनी याविषयीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड पण वादात उतरली आहे. वाघ्याची समाधी 1 मे पर्यंत हटवण्याचे अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने दिले आहे. तर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी सुद्धा या वादात उडी घेतली. या स्मारकाबाबत आमच्या समाजाच्या भावना आहेत. याविषयीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकून घेण्याचे मत त्यांनी मांडले.
 
यावर मुख्यमंत्र्यांनी रोखठोक भूमिका मांडली. फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयीचा वाद समोर आला. यासंदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या स्मारकाकरीता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले आहेत. त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे. इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा तिथे आहे. त्यामुळे त्याविषयीचा निर्णय चर्चा करून घेण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. प्रत्येक गोष्टीवरून वाद निर्माण करणे गरजेचे नाही.
 
सर्वांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांविरोधात उभे झालेले दिसतात. एकीकडे धनगर समाज वेगळा, दुसरीकडे मराठा समाज वेगळा, हे दोन्ही समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद घालणं अयोग्य असल्याचे मत फडणवीस यांनी मांडले.
Powered By Sangraha 9.0