(Image Source : Internet)
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत मुलींसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. बारामती तालुक्यातील ८ ते १५ वयोगटातील मुलींसाठी कर्करोगावरील प्रतिबंधात्मक लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बारामती येथील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. याचवेळी त्यांनी बारामती शहर आणि तालुक्यातील ८ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, त्यांची नुकतीच अदर पूनावाला भेट झाली होती, ज्यात पूनावाला यांनी या लसीच्या विकासाविषयी माहिती दिली.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन करत कर्जमाफीबाबत सद्यस्थितीत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या लसीचा खर्च प्रति डोस २ हजार रुपये असल्याचे सांगत, पवार यांनी स्पष्ट केले की, राज्य किंवा देश पातळीवर याबाबत निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु बारामती तालुक्यात ही मोहीम तात्काळ राबवण्यात येईल. संबंधित वयोगटातील सर्व मुलींना एकत्रित करून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पवार म्हणाले.