(Image Source : Internet)
मुंबई:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सौगात ए मोदी वरुन भाजपावर जोरदार टीका केली. तसंच भाजपाने झेंड्यावरचा हिरवा रंग कधी काढणार ते सांगावं किंवा हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे असेही उद्धव ठाकरेंंनी म्हटले आहे.
शिवसेनेला मुस्लिम समाजाने मतदान केल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले आणि त्यांनी एक आवई उठवली होती की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना मत दिलं तो सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की इथे जे बोंबलत फिरत होते बुरसटेलेले हिंदुत्वादी, बोगस हिंदुत्ववादी यांना पाचर बसली आहे. कारण सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे.
शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण अशा योजनांच्या थापा मारल्या. नंतर आम्ही त्या गावचेच नाही अशा पद्धतीची वक्तव्यं येत आहे. तसं सौगात ए सत्ता जी आहे ती बिहार आणि काय राज्यांच्या निवडणुकीपुरतीच राहणार आहे की पुढेही राहणार आहे हे भाजपाने जाहीर करावं. तसंच आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणे जाहीर करावं. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
इतकेच नाही तर काही उडाणटप्पू आहेत ज्यांचा उल्लेख अनिल परब यांनी भाषणात केला होता, ते टोपी घालून सौगात कशी देतात? तेच आता आम्हाला बघायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.