येत्या काळात शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असे वाटतंय; बच्चू कडू यांच्या विधानाने खळबळ

26 Mar 2025 15:14:56
 
Bachchu Kadu
 (Image Source : Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शरद पवार एकटे पडले.मात्र या दोन्ही गटांमध्ये एकमेकांविरोधात कुरघोडीचं राजकारण होत असलं तरी दोन्हीकडच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात बेछूट आरोप मात्र केलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असे दावे वारंवार करण्यात येत असतात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
 
शरद पवार गटातील काही आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर उत्तर देताना बच्चू कडू यांनी आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागल्याचे विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
 
दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळाले. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठे यश मिळाले तर शरद पवार गटाला पराभवाचा मोठा धक्का बसला.
Powered By Sangraha 9.0