ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनतर्फे 'ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सवा'चे आयोजन

25 Mar 2025 18:25:54
film festival
 
नागपूर:
 
नागपुरात 29 व 30 मार्च 2025 रोजी ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनने (Orange City Cultural Foundation) पी. एम. शाह फाउंडेशन पुणे, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सिनेमोंताज आणि सप्तक यांच्या सहकार्याने 'ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव' आयोजित केला आहे. या दोन दिवसीय चित्रपट महोत्सवात दुपारी 1 ते 7.30 वाजेदरम्यान विविध पुरस्कार प्राप्त एकूण ४१ प्रतिष्ठित चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट आरोग्य आणि वैयक्तिक कल्याणाच्या विविध पैलूंवर आणि मुद्यांवर केंद्रित आहेत.
 
अल्झायमर, ऑटिझम, मानसिक आरोग्य, अवयवदान, अंमली पदार्थांचे व्यसन, लठ्ठपणा, मद्यपान, पर्यावरण, अंधत्व, महिला आरोग्य समस्या, लैंगिक शिक्षण, कर्करोग, सर्पदंश, स्वच्छता आणि संबंधित सामाजिक समस्या यासारखे अनेक आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपटांचे या महोत्सवात स्क्रीनिंग केले जाणार आहे. यातील बरेच चित्रपट हे हिंदी आणि मराठी भाषेत आहेत. हे चित्रपट पी. एम. शाह फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने प्राप्त झाले आहेत.
 
आरोग्य समस्यांबाबत जागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोग्य विषयावर आयोजित होणारा हा मध्य भारतातील पहिला चित्रपट महोत्सव ठरणार आहे. हा चित्रपट महोत्सव पर्सिस्टंट सिस्टम्स, आयटी पार्क, गायत्री नगर यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित केला जात आहे. महोत्सवातील चित्रपट सर्वांना पाहण्यासाठी खुले असून प्रवेश निःशुल्क आहे. सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0