(Image Source : Internet)
रायपूर :
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी शोध मोहीम सुरू असून बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या चकमकीबाबतची माहिती दिली आहे.
चकमकीसंदर्भात माहिती देताना दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, आज सकाळी पोलीस जवान दंतेवाडा विजापूर सीमेवर शोध मोहिमेवर गेले होते. यावेळी नक्षलावाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे अचानक सुरू झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रतुत्तर दिल्यानं नक्षलवादी जंगलात पळून गेले. यावेळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांच्या जवानांना तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. अद्यापही चकमक आणि शोधमोहीम सुरूच असल्याची माहिती आहे.