केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट;खासदारांच्या पगार,भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ

25 Mar 2025 13:40:45
 
central govt
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने (Central government) खासदारांसाठी महत्त्वाची घोषणा केली. महागाईच्या पार्श्वभूमीवर आता खासदारांच्या पगारात तसेच भत्ते आणि निवृत्ती वेतनातही वाढ करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खासदारांच्या पगारात आता लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी त्यांना दरमहा 1,00,000 रुपये वेतन मिळत होते. आता हा आकडा वाढवून 1,24,000 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, प्रतिदिन मिळणारा भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आला आहे.
 
निवृत्त खासदारांसाठी देखील पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना मासिक पेन्शन 25,000 रुपये मिळत होते, जे आता वाढवून 31,000 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी 5 वर्षांहून अधिक सेवा केली आहे, अशा माजी खासदारांना मिळणाऱ्या अतिरिक्त पेन्शनमध्येही वाढ झाली असून, ती 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आली आहे.
 
कर्नाटक विधानमंडळाने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या वेतनात 100 टक्के वाढ केली होती. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारनेही खासदारांसाठी ही घोषणा केल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0