मध्यप्रदेशात कारचा भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू

24 Mar 2025 11:24:54

Car accident mp(Image Source : Internet) 
मुंबई:
मध्य प्रदेशातील (MP) शिवपुरी येथे भिवंडीतील वरिष्ठ डॉक्टरांच्या SUV ला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. भिवंडीतील मंडई भागातील आचार्य हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ डॉक्टर अतुल आचार्य हे आपल्या पत्नी डॉ. तन्वी आचार्य (मेहुणी) आणि चार मित्रांसह तीर्थयात्रेसाठी 10 दिवसांपूर्वी निघाले होते.
 
रविवारी सकाळी उज्जैनकडे जात असताना गुना-शिवपुरी मार्गावर त्यांच्या SUV ला अपघात झाला. दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्यांची कार थेट दरीत कोसळली. या अपघातात डॉक्टर तन्वी आचार्य (50) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघातात डॉक्टर अतुल आचार्य (55, भिवंडी), उदय जोशी (64, दादर), सीमा जोशी (59, दादर) आणि सुबोध पंडित (62, वसई) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिवपुरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे माहिती समजताच भिवंडीच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 
Powered By Sangraha 9.0