मुंबई :
दिशा सालियन प्रकरण (Disha Salian case) सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. दिशाच्या वडिलांनी लेकीच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली. यानंतर राणे परिवाराकडून आदित्य ठाकरेंना पुन्हा टार्गेट करत अटकेची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी मुलगा आदित्यला वाचविण्याकरिता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केल्याचे विधान आमदार नितेश राणेंनी केले. याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. असे असले तरी खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत यावर माहिती दिली आहे. दिल्लीत लोकसभेचे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.
उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले हे खर आहे. त्यावेळी जी घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून माझ्या जुहूच्या घरी चाललो होतो. वांद्रे क्रॉस केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मला फोन आला, असे नारायण राणेंनी सांगितले.
उद्धव ठाकरेंना तुमच्याशी बोलायचंय, असे मिलिंद नार्वेकरांनी मला सांगितले. यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेतला.'जय महाराष्ट्र साहेब असे म्हणाले. तुम्हाला मूले आहेत मलाही आहेत. पत्रकार परिषदेत सध्या तुम्ही आदित्यचे नाव घेता. त्याचे नाव घेऊन नये अशी विनंती त्यांनी आपल्याला फोनवर केल्याचे नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकतर मी अमुक ठिकाणी, अमुक घटनेत कोण आहे? याचा उल्लेख केला नाही, असे राणेंनी यावेळी म्हटले. तुम्ही नाव घेतले त्या मुलाला संध्याकाळी जिथे जातो तिथे जाऊ नको म्हणून सांगा. दिनो मोरयाच्या घरी काय धुमाकूळ घालतात ते तुम्हाला माहीत नाही, असे आपण ठाकरेंना सांगितल्याचे ते म्हणाले.
मी पाहतो सांगतो असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे राणेंनी पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरेंसोबत कोरोना काळात दुसऱ्यांदा बोलणं झालं होतं. माझ्या रुग्णालयाचे उद्घाटन होते. कॉलेजच्या परवानगीसाठी मी कॉल केला असे त्यांनी सांगितल्याचे राणे यांनी सांगितले.