आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; दिशाच्या वडिलांची कोर्टात मागणी

    21-Mar-2025
Total Views |
 
Disha father in court
(Image Source : Internet) 
मुंबई :
राज्याच्या राजकारणात दिशा सालीयान (Disha Salian) मृत्यूप्रकणावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. दिशा हिच्या वडीलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन नंतर तिची हत्या केल्याचा दावा केला आहे.
 
याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती तसेच पोलिस अधिकारी, डॉक्टर यांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या सर्व लोकांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट देखील करण्यात यावी असं सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. या संपूर्ण चौकशी एनआयए किंवा सीबीआयने करावी, असं दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे.
 
ही घटना घडली त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी या घटनेतील आरोपी व अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी इमारत आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) रेकॉर्ड केले गेले नव्हते. त्यामुळे या प्रकरणात त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे सतीश सालियान याचिकेत म्हणाले आहेत.