(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. आता पर्यंत विविध पक्षातील नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यातच आता वंचित बहुजन आघाडीची दोन बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले इंजिनिअर सुरेश फड या दोघांनीही वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोघांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला चांगलाच झटका बसला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे.