(Image Source : Internet)
नागपूर :
रत्नागिरी-नागपूर महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रभावित होणार असून त्यांना अपेक्षित मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रस्ता रोको आंदोलन जाहीर केले होते.
मात्र, संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टी यांना त्यांच्या शिरोळ येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
राजू शेट्टींना अटक करण्यात आली असली तरी शेतकरी आंदोलन मागे हटणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू असला तरी रस्ता रोको आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होईल, अशी ठाम भूमिका शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान महामार्गाच्या विस्तारासाठी नागपूर मार्गावर शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात चौपट मोबदला मिळावा, अशी मागणी केली जात आहे.