(Image Source : Internet)
नागपूर :
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘आरटीई’ प्रवेश मुदतवाढीसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदा राज्यातील ८,८५३ शाळांमधील १,०१,०८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३,०५,१५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
ऑनलाइन सोडतीद्वारे १,०१,९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून, प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राज्यभरातून ४७,९०६ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, सुमारे ५४,०६१ जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी १० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या दुरध्वनीवर संदेश (एसएमएस) प्राप्त होतील परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये, तर आरटीई संकेतस्थळावर जाऊन अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी, अशा सुचना पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. परंतू त्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही, अशा पालकांना शिक्षणविभागाकडून दुरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.