नागपूर:
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयामध्ये दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोघंही गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून कौटुंबिक सत्र न्यायालयात उपस्थित राहिले होते.
धनश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटाबद्दल वकिलांनीही माहिती दिली आहे. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी एकमेकांपासून 18 महिन्यांपासून वेगळे राहत असल्याचे सांगितले. तसेच हा घटस्फोट परस्पर सहमतिने होत असल्याचेही सांगितले. या चौकशीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्र यांच्या वेगळं होण्याचं कारणदेखील समोर आले आहे.
घटस्फोटाचे कारण आले समोर-
धनश्री व युजवेंद्र यांच्या नात्यामध्ये सुसंगतपणा नसल्याचे कारण समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटापूर्वी सुमारे 45 मिनिटे सेशन झाल्यानंतर न्यायालयाने आदेश सुनावला आहे. न्यायाधीशांनी निर्णयामध्ये सांगितले की, आजपासून दोघंही पती-पत्नी नसतील. दरम्यान या निर्णयाने धनश्री व युजवेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.