(Image Source : Internet)
मुंबई :
आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच नुकतंच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणातील 3 बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली.
शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रामध्ये म्हटले की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या नेतृत्वात सेनेचे 2 माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे 5 माजी नगरसेवक, आणि पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत.