(Image Source : Internet)
नागपूर:
हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात बनावट सोयाबीन तेल तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आरोपी नीलेश शाहूला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या गोदामातून सुमारे ८.५६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
मुंबईतील आयपी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे तपास अधिकारी अनूप घोलप यांना माहिती मिळाली होती की, नितेश शाहू नावाचा एक व्यक्ती पीपला फाटा आउटर रिंग रोड येथील एका कारखान्यात किंग्ज सोयाबीन ऑइल, अंबुजा गोल्ड रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइल सारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने बनावट खाद्यतेल तयार करत आहे. .
तपासादरम्यान, गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाला आढळून आले की, आरोपी बनावट स्टिकर्स, झाकणे, पॅकिंग मटेरियल आणि मशीनच्या मदतीने मूळ ब्रँडसारखेच कॅन बनवून बनावट खाद्यतेल बनवत होता आणि तेच बाजारात विकत होता. या माहितीनंतर या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी किंग्ज सोयाबीन ऑइल, अंबुजा गोल्ड रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइलसह अनेक ब्रँडची बनावट उत्पादने जप्त केली. याशिवाय पॅकिंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वजनकाटा आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ८.५ लाख रुपयांचा माल जप्त केला.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध कॉपीराइट कायदा आणि ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस आता आणखी संभाव्य आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान ब्रँडेड तेल कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिस कडक नजर ठेवून आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना कोणत्याही दुकानात किंवा बाजारात संशयास्पद तेल किंवा इतर उत्पादने दिसली तर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे.