अभिनेता अक्षय खन्नाच्या करिअरला नवी गती; पडद्यावरच्या दमदार पुनरागमनाने वाढली लोकप्रियता

09 Dec 2025 19:55:52
 
Akshaye Khanna
 Image Source:(Internet)
मुंबई :
मेहनत आणि वेळ कधी कोणाला काय देईल, हे सांगता येत नाही. काही जण वर्षानुवर्षे प्रयत्न करत राहतात, तर काहींच्या नशिबाला एखाद्या क्षणात नवा उजाळा मिळतो. बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) आयुष्यातही असा बदल घडला आहे. करिअरच्या सुरुवातीला ज्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही, त्याच कलाकारासाठी आज मोठे निर्माते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
 
या वर्षात अक्षय खन्नाने सलग दोन भूमिकांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. छावा मधील औरंगजेब आणि धुरंधर मधील खलनायक या दोन्ही पात्रांना त्याने अशा पद्धतीने साकारलं की त्याच्या अभिनयाची नवी चर्चा सुरू झाली. शांत स्वभाव, प्रसिद्धीपासून कायम अंतर… पण पडद्यावर येताच तो प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, हे पुन्हा सिद्ध झालं.
 
अक्षय खन्नाने पदार्पणापासून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. काही काळ त्याने कामापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु परत आल्यानंतर त्याचा अभिनय आणखी परिपक्व झाल्याचं जाणवतं.
 
त्याचे खाजगी आयुष्यही नेहमीच चर्चेपासून दूर राहिलं. अविवाहित राहण्याचा त्याचा निर्णय आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याची त्याची निवड या सर्व गोष्टींमुळे तो नेहमीच एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिला जातो. तो स्वतःच्या पद्धतीनं जगण्यात विश्वास ठेवतो आणि त्यातच आनंद मानतो.
 
अक्षय खन्नाचा हा नवा टप्पा त्याच्या करिअरला पुन्हा एकदा तेज देतोय. त्याच्या आगामी कामांकडे आता चाहत्यांचेही लक्ष वेधले जात आहे.
Powered By Sangraha 9.0