तुमचीही इंडिगोची फ्लाईट रद्द झाली? रिफंड कसा मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

06 Dec 2025 14:42:05
 
IndiGo Flight cancelled
 Image Source:(Internet)
नागपूर:
इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या मोठ्या गोंधळामुळे देशभरातील प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेकांना विमानतळांवर तासन्तास थांबावे लागत आहे, तर काहींच्या फ्लाईट शेवटच्या क्षणी रद्द होत असल्याने संपूर्ण प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दिल्ली विमानतळाने शुक्रवारपर्यंत इंडिगोच्या काही सेवांना तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन फ्लाईट ड्युटी टाइम नियमांमुळे कर्मचारी उपलब्धतेत मोठी तूट निर्माण झाली आणि त्यामुळे अनेक मार्गांवरील इंडिगोची विमाने वेळेवर उड्डाण करू शकली नाहीत. या अडचणीमुळे दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या प्रमुख विमानतळांवर मोठा गोंधळ निर्माण झाला असून, दरम्यान अचानक तिकिटांचे भाडेदरही वाढल्याने प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे.
 
या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांची माफी मागत 5 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत रद्द झालेल्या किंवा बदललेल्या प्रवासांसाठी पूर्ण रिफंड देण्याची घोषणा केली आहे. विमान कंपनीने स्पष्ट केले आहे की प्रवासी इच्छित असल्यास पुढील उपलब्ध फ्लाइटवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुन्हा बुकिंग करू शकतात. DGCA च्या नियमांनुसार विमान कंपनीच्या चुकांमुळे फ्लाईट रद्द झाली किंवा वेळेवर उड्डाण झाले नाही तर प्रवाशाला संपूर्ण रक्कम परत मिळणे बंधनकारक आहे. तिकिट नॉन-रिफंडेबल असले तरी कर आणि एअरपोर्ट शुल्क परत केले जाते, तसेच पुनर्बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
 
रिफंड मिळवण्याची प्रक्रिया देखील साधी ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रथम इंडिगोच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन Manage Booking मध्ये पीएनआर टाकून त्यांच्या फ्लाईटचे स्टेटस तपासायचे आहे. त्यानंतर रिफंड घ्यायचा की पुढील फ्लाईटवर पुन्हा बुकिंग करायचे हे ठरवता येते. रिफंडची विनंती ऑनलाइन सबमिट केल्यास पेमेंट ऑनलाइन केले असल्यास पाच ते सात दिवसांत रक्कम त्याच खात्यात जमा होते. कॅश पेमेंट केलेल्या प्रवाशांना विमानतळ काउंटरवर जाऊन ओळखपत्रासह दावा करावा लागतो.
 
अडकलेल्या प्रवाशांसाठी इंडिगोकडून आणखी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. अनेक शहरांमध्ये हॉटेल खोल्या, वाहतूक आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, विमानतळांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करून मदतसेवा वाढवण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांद्वारे प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0