Image Source:(Internet)
नागपूर :
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना पाच कोटी रुपयांच्या मानहानी नोटीस बजावल्या आहेत.
चार डिसेंबर रोजी नागपूर प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुलेखा कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप, काळ्या पैशांच्या व्यवहारात सहभाग, आणि इतर गंभीर आरोप केले होते. हे आरोप विविध वृत्तवाहिन्यांवरही प्रसारित झाले होते. मात्र, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीशीत हे सर्व आरोप “पूर्णपणे खोटे, निराधार आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का पोहोचवणारे” असल्याचे नमूद केले आहे.
नोटीसमध्ये सुलेखा कुंभारे यांना तातडीने सर्व बदनामीकारक विधान मागे घेण्याची, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील तसेच सोशल मीडियावरील त्यांच्या प्रसारणाला पूर्ण विराम देण्याची आणि सार्वजनिकरीत्या बिनशर्त माफी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नोटीस न पाळल्यास पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई १५ दिवसांच्या आत अदा करावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
बावनकुळे यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे की, नोटीस न मानल्यास दिवाणी तसेच फौजदारी दोन्ही प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याचा संपूर्ण खर्च सुलेखा कुंभारे यांच्यावरच राहील.महसूलमंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता कडक कायदेशीर लढाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.