Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शेतकरी वर्गासाठी आजची सकाळ मोठा दिलासा घेऊन आली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली मोठी शेतकरी (Farmers) कर्जमाफी अखेर आकाराला येत असून, यंदाच्या योजनेबाबतचा प्राथमिक आराखडा ठरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या वेळी कर्जमाफीसाठी कोणतीही रक्कम मर्यादा ठेवली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मर्यादारहित कर्जमाफी—शेतकऱ्यांसाठी मोठा श्वास
पूर्वी १.५ ते २ लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळत असल्याने अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले होते. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, शेतकऱ्यांचे ‘सातबारा पावती कोरी’ करण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी बँकांच्या थकबाकीत अडकले आहेत. या शेतकऱ्यांवर एकत्रितपणे ३५,४७७ कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गासाठी संपूर्ण कर्जमाफी हा मोठा दिलासा ठरणार आहे. रकमेवरील बंधने हटवल्याने लाखो शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अभ्यास समितीचा अहवाल एप्रिलमध्ये-
या व्यापक कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती स्थापन केली आहे. समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला विस्तृत अहवाल सरकारला देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सरकारने येत्या ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी अमलात आणण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात समाधान आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपेक्षा अधिक व्यापक-
२०१७ मध्ये १.५ लाख रुपये आणि २०१९ मध्ये २ लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांना फायदा मिळू शकला नाही. यावेळी शेतकरी संघटनांच्या मागणीवरून मर्यादारहित कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीमुळे मोठे बदल घडणार?
• जिल्हानिहाय कर्ज तपशील मागवून आराखडा तयार
• बँकांवरील शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित होण्याची शक्यता
• शेती क्षेत्रात नव्या गुंतवणुकीला गती
• जवळपास २५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना नवा टप्पा ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.