इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक पुढील वर्षी पूर्ण होणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM फडणवीसांची घोषणा

06 Dec 2025 12:03:04
 
CM Fadnavis announcement
 Image Source:(Internet)
मुंबई :
दादरच्या चैत्यभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day) भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. कालपासून सुरू असलेला श्रद्धांजलीचा ओघ आज अधिक वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
 
चैत्यभूमीवरील भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदू मिल परिसरात उभारत असलेल्या स्मारकासंदर्भात मोठी माहिती दिली. “इंदू मिल येथील विशाल आंबेडकर स्मारकाचे काम पुढील वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्णत्वास जाईल,” असे त्यांनी सांगितले.
 
या स्मारकात 450 फूट उंचीचा डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा उभा राहणार असून, तो जगातील अत्यंत उंच स्मारक पुतळ्यांत गणला जाणार आहे. 11 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भूमिपूजनानंतर प्रकल्पाला गती मिळाली असून, राज्य सरकारने डिसेंबर 2026 हा पूर्णत्वाचा कालावधी निश्चित केला आहे.
 
फडणवीस यांनी या वेळी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल विशेष उल्लेख केला. अलीकडेच न्यू जर्सीच्या राज्यपालांसोबतच्या बैठकीत अमेरिकेत राष्ट्रीय वीज ग्रिड नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला. “हे ऐकून बाबासाहेबांनी मांडलेली राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना किती आगळीक आणि पुढचे भान असलेली होती, हे पुन्हा अधोरेखित झाले,” असे ते म्हणाले.
 
बाबासाहेबांनी वीजमंत्री म्हणून काम करताना देशभरातील वीज पुरवठा एकसंध करण्याची कल्पना मांडली होती, आणि आजही भारत त्या धोरणाचा लाभ घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
“बाबासाहेबांचे निर्णय, त्यांची विचारसरणी आणि राष्ट्रनिर्मितीची दृष्टी आजच्या पिढीलाही प्रेरणा देणारी आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0