Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मोठी संधी हातातून गेल्याचं समोर आलं आहे. जर्मनीमध्ये (Germany) विविध क्षेत्रांत काम करण्यासाठी राज्यातील दहा हजार तरुणांना रोजगाराची दारं खुली झाली होती. 2024 मध्ये शासनाने यासाठी स्वतंत्र निर्णय काढत प्रशिक्षणापासून ते परदेशात नियोजनापर्यंत सर्व तयारीसाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.
उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकास, कृषी, उद्योग आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मनीत कामाची संधी मिळणार होती. जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांचा प्रवास निश्चित मानला जात असतानाच, वर्षभरात एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्षात पाठवण्यात आलं नाही. परिणामी, उपलब्ध असलेली सुवर्णसंधी वाया गेल्याने विद्यार्थी आणि पालक दोघांतही तीव्र नाराजी पसरली आहे.
शासकीय मान्यताप्राप्त रिक्रूटमेंट एजंट चित्रा उबाळे यांनी सांगितलं की, ही संधी वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारला विशेष विनंती करण्यात आली आहे. जर्मनीचे मंत्री आणि संबंधित अधिकारी मुंबईत येऊन या प्रकरणावर चर्चा करणार असल्याची माहितीही आहे. मात्र, आतापर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे सरकारवर उदासीनतेचे आरोप होत आहेत.