चव्हाण यांच्या विधानाने राज्यात राजकीय खळबळ; महायुतीत ताण वाढला, बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

05 Dec 2025 19:53:08
 
Ravindra Chavan Bawankule
 Image Source:(Internet)
नागपूर :
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Chavan) यांच्या “२ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे” या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी हलचल निर्माण केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ स्पष्ट न झाल्याने महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विरोधकांनी तर हे वक्तव्य म्हणजे सरकारमधील अंतर्गत तणावाचे प्रतिबिंब असल्याचा आरोप केला आहे.
 
याचदरम्यान नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकांचा माहोल तापलेला असताना शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील नाराजी उघडपणे जाणवू लागली आहे. डोंबिवलीतील राजकीय हालचाली, फोडाफोडीचे आरोप आणि शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये झालेला प्रवेश या सर्व घटनांमुळे दोन्ही पक्षांमधील तणाव अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे येत परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. “रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य हे पूर्णपणे स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात होते. दोन तारखेपर्यंत स्थानिक परिस्थिती पाहून काही निर्णय घ्यावे लागतील एवढाच त्याचा अर्थ,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी विरोधकांवर अनावश्यक संशय निर्माण केल्याचा आरोपही केला.
निवडणूक प्रक्रियेतील सुरू असलेल्या गोंधळाविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, “आम्ही राज्य निवडणूक आयोगाला काही मुद्यांवर पत्रव्यवहार केला आहे. निवडणुका पुढे ढकलणे हितावह ठरणार नाही. जर कुठे गैरव्यवहार झाले असतील, तर त्यावर न्यायालय निर्णय देईल.”
 
कामठीतील कथित खोटे मतदान प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया देत, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या मताला विरोध करत नाही,” असे सांगितले.
 
चव्हाण यांच्या विधानामुळे तयार झालेल्या राजकीय चर्चेला बावनकुळेंनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काही प्रमाणात विराम मिळाला असला, तरी आगामी दिवसांत महायुतीतील समीकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0