ठाण्यात उद्धव ठाकरे यांची अनपेक्षित चाल; शिंदे गटाच्या पारंपरिक मतदारसंघात नवा राजकीय भूकंप

03 Dec 2025 11:09:36
 
Uddhav Thackeray New political
 Image Source:(Internet)
मुंबई :
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान राज्यभरात उत्साहासोबतच किरकोळ धांदल, भांडणे आणि पोलिसांशी धक्काबुक्कीची प्रसंगिक चित्रे दिसली. दुपारनंतर मतदारांच्या वाढत्या उपस्थितीमुळे अनेक केंद्रांवर रांगा वाढल्या. मतदानाच्या या वातावरणातच ठाण्यात (Thane) एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आणि सर्वांचे लक्ष तिकडे वळले.
 
शिंदे यांच्या आधारवडावर उद्धव ठाकरेंचा धडक प्रवेश-
शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यातील अंतर्गत तणाव मागील काही दिवसांपासून उघडपणे समोर येत असताना, ठाणे जिल्ह्यात शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे झुकत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव) गटाने शिंदे यांच्या परंपरागत पूर्व कोपरी मतदारसंघातच दमदार प्रवेश करून नवी राजकीय उर्मी निर्माण केली आहे.
 
आबा मोरे यांचा निर्णय ठाण्याच्या राजकारणात नवे वळण-
विसाव्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय राहिलेले आणि उपविभागप्रमुख पद भूषवलेले आबा मोरे यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वावरील नाराजी व्यक्त करत गटाला रामराम ठोकला. ‘ज्येष्ठ शिवसैनिकांचा अवमान होत आहे’ या कारणावरून मोरे यांच्यासह २००–३०० निष्ठावान कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर हजेरी लावून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन स्वीकारले व ‘मशाल’ चिन्हावर विश्वास दाखवला.
 
मोरे हे ठाण्यातील माजी सभागृहनेते पांडुरंग पाटील यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे पूर्व कोपरीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटातील काही स्थानिक नेतृत्वाकडून होणारी उपेक्षा हा देखील त्यांच्या बाहेर पडण्यामागील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
ठाण्यातील समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता-
या नाट्यमय घडामोडीनंतर ठाण्यातील राजकारणात उत्सुकता वाढली असून, शिंदे गटाच्या ‘किल्ल्यात’ उद्धव ठाकरे यांच्या या अनपेक्षित ‘राजकीय डावामुळे’ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
Powered By Sangraha 9.0