Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात महापालिका निवडणुकीचा ताण वाढत चाललाय. २ डिसेंबर रोजी झालेल्या काही नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. आगामी निवडणुकीत मराठी शाळा आणि मराठी भाषा हाच त्यांचा मुख्य अजेंडा असणार आहे.
मंगळवारी एका शिष्टमंडळाशी चर्चा करताना ठाकरे यांनी स्पष्ट केले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष जाहीरनामा जारी करणार असून, त्यात मराठी शाळांच्या उन्नतीसाठी आणि मराठी भाषेच्या अनिवार्य अंमलबजावणीसाठी योजना ठेवण्यात येतील.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे-
* महापालिका आणि इतर स्थानिक संस्था येथील मराठी शाळांना आर्थिक व तांत्रिक मदत देणे.
* शाळांचे दर्जा सुधारण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देणे.
* शिक्षकांचे प्रशिक्षण सुधारण्यावर भर देणे.
* विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण साहित्य देण्याची हमी.
* सरकारी तसेच खासगी व्यवहारांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे आणि त्यासाठी कठोर नियम लागू करणे.
हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांचा तीव्र विरोध-
शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या योजनेवर ठाकरे यांनी जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रात यामुळे मोठा विरोध वाढला असताना, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या निर्णयावर ठाकरे यांनी आशा व्यक्त केली की, ती पुन्हा हिंदी सक्तीची चूक करणार नाही.