नागपुरात ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; अजनी पोलिसांची कारवाई, २४ जणांना अटक

03 Dec 2025 23:31:08
 
Online betting
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरात वाढत चाललेल्या ऑनलाइन सट्टेबाजीला (Online betting) आळा घालण्यासाठी अजनी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २४ जणांना अटक केली. १ डिसेंबरच्या रात्रीपासून २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सलग चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी जवळपास ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध सट्टेबाजीच्या मोठ्या जाळ्याचा भंडाफोड केला.
 
कारवाईची सुरुवात रूपनगरातील आम्रपाली गार्डन परिसरातील गल्लीत झाली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे छापा टाकला आणि श्रमजीवी नगरचा २१ वर्षीय मनविश्वास देशभ्रतार हा तरुण मोबाइलद्वारे ऑनलाइन सट्टा चालवत असल्याचे आढळले. त्याला त्वरित अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याने सट्ट्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘सम्राट’ नावाच्या व्यक्तीशी शेअर करत असल्याचे उघड केले.
 
पहिल्या छाप्यात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लगेचच दुसरी कारवाई न्यू मनीष नगर येथील प्रोजान अपार्टमेंटमध्ये केली. फ्लॅट क्रमांक ५०५ मध्ये २३ जण एकत्र बसून ऑनलाइन सट्टा-पट्टीचे व्यवहार करत असल्याचे पोलिसांच्या हाती लागले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सट्टा ‘लागवाडी’ आणि ‘खायवाडी’ सुरू असल्याचे पोलिसांना आढळले.
 
या दोन ठिकाणांवरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. यात २४ स्मार्टफोन, कीपॅड फोन, लॅपटॉप, ऑडिओ मिक्सर, QR स्कॅनर यांचा समावेश असून सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे मर्सेडीज बेंझ आणि इनोव्हा अशा दोन महागड्या चारचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. एकूण जप्तीची किंमत ३६.९३ लाख रुपये इतकी सांगितली जात आहे.
 
अजनी पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले असून ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आता या रॅकेटमागील ‘मास्टरमाइंड’ कोण आणि पैसे कुठे वळवले जात होते, याचा तपास सुरू आहे. नागपुरातील ऑनलाइन सट्टेबाजीचे हे मोठे जाळे उघडकीस येताच शहर पोलिस दलाने मोठा दिलासा व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0