UIDAI Alert : आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना; स्कॅमपासून बचावासाठी ‘ही’ 5 कामे करा

29 Dec 2025 20:54:21
 
Aadhaar card
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
आधार कार्ड (Aadhaar card) हे आज प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकिंग, सरकारी योजना, सिमकार्ड, पॅन यांसारख्या अनेक सेवांसाठी आधारचा वापर होत असल्याने त्याची सुरक्षा तितकीच महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवीन अपडेटेड आधार ॲप लॉन्च केले असून, डेटा सुरक्षेबाबत महत्त्वाचा इशाराही दिला आहे.
 
UIDAI च्या या नव्या ॲपमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना आधार कार्डाची हार्डकॉपी किंवा झेरॉक्स सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही. यासोबतच UIDAI ने आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.
 
आधारची सुरक्षा का गरजेची?
आधार कार्डचा वापर अनेक अत्यावश्यक सरकारी तसेच खासगी सेवांसाठी केला जातो. जर आधारशी संबंधित माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर बायोमेट्रिक डेटा आणि वैयक्तिक तपशीलांचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे आणि ओळख चोरीसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI चे 5 महत्त्वाचे उपाय
1) OTP शेअर करू नका
आधारशी संबंधित कोणताही OTP कोणालाही सांगू नका. OTP ही तुमच्या डेटाची सर्वात महत्त्वाची सुरक्षा कवच आहे. OTP शिवाय कोणालाही तुमच्या आधार तपशीलांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही.
2) मास्क्ड आधारचा वापर करा
हॉटेल, सिमकार्ड किंवा इतर सेवांसाठी ओळख देताना मास्क्ड आधार वापरण्याचा सल्ला UIDAI ने दिला आहे. या प्रकारात आधार क्रमांकातील पहिले 8 अंक लपवलेले असतात आणि फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.
3) बायोमेट्रिक लॉक सक्रिय ठेवा
UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून फिंगरप्रिंट, आयरिस आणि फेस डेटा लॉक करता येतो. बायोमेट्रिक लॉक केल्यास तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचा आधार वापरू शकणार नाही.
4) आधारची माहिती ऑनलाइन टाकू नका
आधार कार्डचा फोटो किंवा झेरॉक्स सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. अशा ठिकाणी माहिती टाकल्यास सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून तिचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते.
5) शंका असल्यास अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क करा
 
आधार डेटाचा गैरवापर झाल्याची शंका वाटल्यास किंवा कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ UIDAI च्या अधिकृत हेल्पलाइन किंवा वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
 
UIDAI च्या या सूचनांचे पालन केल्यास आधार कार्ड सुरक्षित राहण्यास मदत होईल, तसेच सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करता येईल.
Powered By Sangraha 9.0