Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (BMC Election) मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारीवरून राजी-नाराजीचे नाट्य रंगत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या (Candidates) याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या गुप्ततेत नावे निश्चित केली जात आहेत.
भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी 70 हून अधिक उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही मुंबई महापालिकेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 70 उमेदवारांचा समावेश असून काही जागांवर काँग्रेसने आश्चर्यकारक निवडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माहिम मतदारसंघात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माहिममधील वार्ड क्रमांक 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून त्यामुळे या मतदारसंघातील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत. “आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया,” असा संदेश देत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काळात इतर पक्षांकडूनही उर्वरित उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.