Image Source:(Internet)
कोल्हापूर :
आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची मोठी यादी जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. एकूण ८१ जागांपैकी ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून ही यादी आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केली. या यादीत १५ माजी नगरसेवकांचा समावेश असून तब्बल ३३ नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देत पक्षाने नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
जाहीर झालेल्या यादीत माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते आणि प्रकाश पाटील यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. अनुभवी नेते आणि नवोदित कार्यकर्ते यांचा समतोल राखत काँग्रेसने ही यादी तयार केल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष या यादीकडे लागले होते. अखेर रात्री उशिरा यादी प्रसिद्ध होताच उमेदवार आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, तर संधी न मिळालेल्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया आघाडी’च्या माध्यमातून लढवण्याच्या चर्चांना वेग आला असून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील राजकीय जवळीकही अधिक स्पष्ट होताना दिसत आहे.
महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी एकूण ३२९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. सकाळपासून सुरू असलेली निवड समितीची बैठक रात्री अकरानंतर संपली आणि त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, आनंद माने, राजू लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील, तौफिक मुल्लाणी, विक्रम जरग आणि भरत रसाळे यांच्या समितीने पार पाडली.
दरम्यान, उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी नाराज न होता पक्षासाठी काम करावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. एका प्रभागात अनेक इच्छुक असल्याने निर्णय घेण्यात अडचणी आल्याचे सांगत, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसह महायुतीचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही प्रभागांमध्ये पती-पत्नींच्या उमेदवारीमुळेही राजकीय चर्चांना उधाण आले असून, काँग्रेसच्या या पहिल्या यादीमुळे कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढली आहे.