Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शिक्षकांना (Teachers) केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षकांना ‘बीएलओ’ व इतर निवडणुकविषयक कामांमधून वगळण्यात यावे,यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुरुवातीपासून आग्रही आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुसे यांनी यासंदर्भात त्यांना पुन्हा एकदा साकडे घातले आहे.
शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी, तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम देण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र, असे असतानाही अनेक शिक्षकांना महिनोंमहिने निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी पुरेसे शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे. किमान ९० टक्के प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शिक्षकालाच मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत असते. अनेक ठिकाणी एकाच शिक्षकाकडे २-३ वर्गांची अध्यापन जबाबदारी असते.
एका बाजूला अशी सारी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला वर्षभर चालणाऱ्या मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामासाठी बीएलओ म्हणून प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना नियुक्त केले जात आहे. शिक्षकांकडे आधीच विविध प्रकारची अशैक्षणिक कामे दिली गेली असल्याने बीएलओच्या कामामुळे शिक्षकांवर आणखी ताण पडत आहे. त्याचा दैनंदिन अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
Sant Nivruttinath Yatra : कुंभमेळ्याच्या कामाचा संत निवृत्तीनाथ पौषवारीला फटका ? खोदकामाने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता झालाय अडथळ्यांची शर्यत !
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना यासंदर्भात वेळोवेळी आश्वस्थ केले आहे. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी मुख्यमंत्र्यांनाच लेखी पत्र देऊन शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा,अशी विनंती आता केली आहे. शिक्षण हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य अध्यापन हेच आहे. मात्र, अलिकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि इतर अशैक्षणिक कामांवर जुंपले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात,असे भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पर्यायी व्यवस्था काय ?
शिक्षकांऐवजी ही कामे कोणाला देता येतील, याचा पर्यायही भुसे यांनी या पत्रात सुचवला आहे. अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोस्टमन, आरोग्य कर्मचारी, आशा ताई, आणि पालिका कर्मचारी अशा विविध विभागातील मनुष्यबळाचा वापर बीएलओ कामांसाठी करता येऊ शकतो,असे निवडणूक आयोगाच्या सूचनांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे. राज्यात बीएलओच्या कामासाठी अन्य मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शिक्षकांचा वापर करणे टाळावे, असा आग्रह भुसे यांनी या पत्रात धरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिक्षकांची बीएलओच्या कामातून लवकरच सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.