अभिनेता सलमान खानने पनवेल फार्महाऊसवर साध्या पद्धतीने साजरा केला ६०वा वाढदिवस

27 Dec 2025 17:10:09
 
Actor Salman Khan
 Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आपला ६०वा वाढदिवस यंदा शहराच्या गोंगाटापासून दूर, पनवेलजवळील फार्महाऊसवर अत्यंत खास आणि शांत वातावरणात साजरा केला. या खासगी सेलिब्रेशनला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रपरिवार उपस्थित होते.
 
सलमान खान यांच्यासोबत त्यांचे वडील सलीम खान, आई सलमा खान, भाऊ सोहेल खान व अरबाज खान (पत्नी शूरा खानसह), बहिणी अर्पिता खान शर्मा आणि अलवीरा खान अग्निहोत्री उपस्थित होत्या. तसेच भाचे-भाची अरहान, निर्वाण, अहिल आणि आयत यांनीही या आनंदात सहभाग घेतला. विशेष म्हणजे २७ डिसेंबर हा दिवस कुटुंबासाठी दुहेरी आनंदाचा असतो, कारण याच दिवशी आयतचा वाढदिवसही साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी दोघांचे वाढदिवस एकत्रच साजरे होतात.
 
या खास सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रीडाजगतातील अनेक नामवंतांनी हजेरी लावली. अभिनेता संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, क्रिकेटपटू एम.एस. धोनी, रितेश देशमुख-जेनेलिया डिसूझा (मुलांसह), महेश मांजरेकर, संगीता बिजलानी, हुमा कुरेशी, रमेश तुरानी आणि निखिल द्विवेदी यांसारख्या सेलिब्रिटींचा त्यात समावेश होता.
 
वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान काही काळासाठी फार्महाऊसबाहेर आले आणि छायाचित्रकारांसोबत केक कापत चाहत्यांचे आभार मानले. या वेळी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
 
दरम्यान, मुंबईत चाहत्यांसाठी खास क्षण पाहायला मिळाला. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘हॅपी बर्थडे सलमान’ असा खास संदेश झळकवण्यात आला, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
Powered By Sangraha 9.0