मुंबई मनपा शिंदेसेना सत्तेत असली तरी महापौर भाजपचाच; महायुतीच्या फॉर्म्युलातच शिंदेंचा ‘चेकमेट’!

26 Dec 2025 17:57:21
 
Mahayuti
 Image Source:(Internet)
मुंबई :
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीतील अंतर्गत गणित उघड होत आहे. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावर एकमत झाले असले, तरी या फॉर्म्युलात शिंदेसेनेच्या हाती काहीही ठोस सत्ता येणार नाही, असा स्पष्ट राजकीय सूर उमटू लागला आहे.
 
सूत्रांनुसार, 227 जागांच्या मुंबई महापालिकेत भाजप 140 तर शिंदेसेना 87 जागा लढवणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 114 जागांचा आकडा लक्षात घेतला, तर भाजप एकट्याच दमावर सत्तेच्या जवळ पोहोचतो. अशा परिस्थितीत महायुतीचा महापौर भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
 
महापौरपद शिंदेसेनेच्या आवाक्याबाहेर-
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदेसेनेने आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकल्या, शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवला तरीही महापौरपद त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता नाही. कारण बहुसंख्य जागा भाजपकडे असल्याने निर्णयाची किल्ली पूर्णपणे त्यांच्या हातात राहणार आहे. त्यामुळे “महायुतीचा महापौर” हे वाक्य शिंदेसेनेसाठी केवळ समाधानापुरतेच उरणार आहे.
 
मुंबईत तिरंगी-चौफेर लढत-
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करून मैदान तापवले आहे. काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गट, रासप आणि वंचितसोबत आघाडीचा डाव आखला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे.
 
सत्ताधाऱ्यांसाठी कसोटी-
शिंदेसेना-भाजप या सत्ताधारी युतीसाठी ही निवडणूक सोपी नाही. मुंबईत पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. विशेषतः शिंदेसेनेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि ताकद दाखवण्याची कसोटी ठरणार आहे.
 
ठाणे-नवी मुंबईत ‘सेटलमेंट’ होणार का?
मुंबईत महापौरपद हातातून जात असताना, या तडजोडीचा फायदा शिंदेसेनेला ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांमध्ये होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील हे अंतर्गत राजकारण पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0