भिवंडी हादरली; अवघ्या 48 तासांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता, पालकांमध्ये तीव्र भीती

26 Dec 2025 16:04:10
 
Four minor girls missing
 Image Source:(Internet)
भिवंडी :
नवी मुंबई परिसरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण असतानाच आता भिवंडीमध्येही (Bhiwandi) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील विविध भागांतून अवघ्या दोन दिवसांत चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
 
या प्रकरणी शांतीनगर, कोनगाव आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असली तरी, घटनांची वारंवारता शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
 
वेगवेगळ्या भागांतून मुले बेपत्ता-
समोर आलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. पहिल्या घटनेत ४ डिसेंबर रोजी पाणीपुरी खाण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी तब्बल २० दिवसांनंतर २४ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दुसऱ्या घटनेत २० डिसेंबर रोजी सकाळी नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेलेली १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. नातेवाइकांकडून सर्वत्र शोध घेऊनही काहीच धागेदोरे न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.
 
कोनगाव आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घटना-
कोनगाव परिसरातून २३ डिसेंबर रोजी १६ वर्षीय मुलगी कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेली. तिच्या अल्पवयाचा गैरफायदा घेत कुणीतरी तिचे अपहरण केल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.
 
दरम्यान, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ डिसेंबर रोजी १५ वर्षीय मुलगा ट्यूशनला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो पुन्हा घरी परतलाच नाही, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
 
पोलिसांचा तपास सुरू, नागरिकांत अस्वस्थता
या सर्व प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिस तपास करत आहेत.
 
अल्पवयीन मुलांच्या बेपत्तेपणाच्या वाढत्या घटनांमुळे भिवंडीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0