चंद्रपूर भाजपमध्ये खदखद; मुनगंटीवार–जोर्गेवार शाब्दिक वाद; बवानकुळे म्हणाले, कोणताही मतभेद नाही!

26 Dec 2025 17:07:29
 
BJP Bawankule
 Image Source:(Internet)
नागपूर :
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील (BJP) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नागपुरात झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोर्गेवार यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची जोरदार चर्चा आहे. या घटनेमुळे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी नागपूरच्या धंतोली येथील भाजप विभागीय कार्यालयात ही बैठक पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बवानकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रभारी अशोक नेते, निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रमुख किशोर जोर्गेवार, माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीत सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्यावर एकमत झाले असले तरी काही मुद्द्यांवरून मुनगंटीवार आणि जोर्गेवार यांच्यात तीव्र शब्दयुद्ध झाल्याचे सांगितले जाते. वातावरण चिघळण्यापूर्वी उपस्थित नेत्यांनी हस्तक्षेप करत वाद शांत केला.
 
दरम्यान, या कथित वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बवानकुळे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या. “भाजपमध्ये कोणताही मतभेद नाही. सर्व नेते एकत्र असून चंद्रपूर मनपा निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखालीच लढली जाईल,” असा दावा त्यांनी केला. उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत यादी जाहीर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
एकीकडे वादाच्या चर्चांनी भाजपची डोकेदुखी वाढवली असली, तरी दुसरीकडे पक्षाकडून मात्र एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत तणाव कितपत परिणाम करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0