ITR रिटर्नबाबत आयकर विभागाचा इशारा; 31 डिसेंबरनंतर 5,000 रुपयांचा दंड, करदात्यांसाठी महत्त्वाची सूचना

25 Dec 2025 18:42:13

Income Tax DepartmentImage Source:(Internet) 
नागपूर :
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आयकर विभागाने (Income Tax Department) अनेक करदात्यांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. आयकर रिफंडसाठी केलेले दावे आणि विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती यामध्ये तफावत आढळल्याने संबंधित करदात्यांचा रिफंड तात्पुरता थांबवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत करदात्यांनी तात्काळ आपल्या इनकम टॅक्स रिटर्नमधील त्रुटी तपासून सुधारित इनकम टॅक्स रिटर्न (Revised ITR) दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
आयकर अधिनियम 1961 च्या कलम 139(5) नुसार, मूळ रिटर्न भरताना उत्पन्नाची माहिती चुकली असेल, कपात चुकीची दाखल झाली असेल किंवा आकडेवारीत त्रुटी राहिली असेल, तर ती दुरुस्त करण्याची संधी करदात्यांना दिली जाते. यालाच सुधारित ITR असे म्हणतात. या प्रक्रियेत उत्पन्न, डिडक्शन, सूट किंवा ITR फॉर्मचा प्रकार बदलण्याची मुभा असते. विशेष म्हणजे, अंतिम मुदतीपर्यंत करदाता एकापेक्षा अधिक वेळा सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.
 
सुधारित ITR दाखल करण्यासाठी करदात्यांनी आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून ‘File Income Tax Return’ या पर्यायातून ‘Revised Return’ निवडावा. त्यानंतर मूळ रिटर्नचा अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर आणि तारीख भरून सुधारित माहिती सादर करावी व रिटर्न व्हेरिफाय करून सबमिट करावा.
 
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की सुधारित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. या मुदतीत चुका दुरुस्त न केल्यास करदात्यांना पुढे Updated ITR (ITR-U) दाखल करावा लागेल. मात्र, या पर्यायामध्ये तब्बल 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, तसेच रिफंड मिळण्याची प्रक्रिया अधिक विलंबित होण्याची शक्यता असते.
 
दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलासा देत स्पष्ट केले आहे की, ज्यांनी कपात व सूट योग्य आणि कायदेशीर पद्धतीने दाखल केली आहे, अशा करदात्यांना सुधारित ITR दाखल करण्याची आवश्यकता नाही.
 
करदाते आपल्या सुधारित ITR किंवा रिफंडचा स्टेटस आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून ‘View e-Filed Returns/Forms’ या पर्यायातून सहज तपासू शकतात. त्यामुळे संभाव्य दंड टाळण्यासाठी आणि रिफंड वेळेत मिळवण्यासाठी करदात्यांनी त्वरित आपल्या ITR ची पडताळणी करणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0