चित्रदुर्गात भयावह अपघात; कंटेनरची धडक, स्लीपर बसला भीषण आग,१७ जणांचा बळी

25 Dec 2025 11:24:29
 
Chitradurga
 Image Source:(Internet)
चित्रदुर्ग :
कर्नाटकातील चित्रदुर्ग (Chitradurga) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर एक अत्यंत भीषण अपघात घडला. बंगळुरूहून गोकर्णाकडे निघालेल्या खासगी स्लीपर बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने दुभाजक ओलांडत जबर धडक दिली. या धडकेनंतर बसच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या दुर्घटनेत किमान १७ प्रवाशांचा मृत्यू, तर २५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले.
 
ही घटना हिरियूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बसमध्ये चालक आणि वाहकासह ३१ प्रवासी होते. त्यात १४ महिला आणि १५ पुरुषांचा समावेश होता. कंटेनर हिरियूरकडून बंगळुरूकडे जात असताना त्याचा ताबा सुटला आणि तो थेट बसवर आदळला, अशी प्राथमिक माहिती आहे.
 
अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. मात्र, कंटेनर चालक कुलदीप याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आगीमुळे बस पूर्णतः जळून खाक झाली.
 
या दुर्घटनेचा फटका वाहतुकीलाही बसला असून NH-48 वर जवळपास ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शिरा परिसरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस अधीक्षक रणजीत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
 
अपघातग्रस्त बसमधील बहुतांश प्रवासी गोकर्णा, कुमटा आणि शिवमोगा येथील असल्याची माहिती आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृत व जखमींची अंतिम ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
 
Powered By Sangraha 9.0