Image Source:(Internet)
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, महायुतीतील (Grand alliance) जागावाटप आणि युतीचा फॉर्म्युला पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. नगर परिषद निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने महायुतीचा पॅटर्न होता, तोच महापालिका निवडणुकांमध्येही कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिका निवडणुकीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी जळगावमध्ये अधिकृतपणे युती जाहीर केली असून, या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. युतीची घोषणा होत असताना आम्हाला बैठकीसाठी बोलावलेच नाही, अशी उघड नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
संजय पवार यांनी सांगितले की, भाजप आणि शिवसेनेची बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महायुतीत राष्ट्रवादी २६ जागांवर आग्रही असून, केवळ १२ जागांवर तडजोड करू शकतो. त्यापेक्षा कमी जागा मान्य होणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, सन्मानकारक जागावाटप झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवला असल्याचे संकेतही संजय पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता जळगावमध्ये नेमकं काय होणार, भाजप–शिंदे सेनेचीच युती राहणार की महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार, की अजित पवार गट वेगळी वाट धरतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.