डिसेंबरचा शेवटचा आठवडा कुणासाठी नफ्याचा, तर कुणासाठी आव्हानांचा; राशीभविष्य काय सांगते?

24 Dec 2025 20:15:45
 
December
 Image Source:(Internet)
मुंबई :
२०२५ या वर्षाला निरोप देणारा डिसेंबरचा (December) अखेरचा आठवडा (२५ ते ३१ डिसेंबर) अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. ग्रहस्थितीतील बदलांमुळे काही राशींवर भाग्याची मेहेरनजर राहणार असून आर्थिक लाभ, करिअरमधील प्रगती आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणार आहेत. मात्र काही राशींना या काळात आरोग्य, पैसा आणि नातेसंबंधांच्या बाबतीत जपून पावले टाकावी लागणार आहेत.
 
या कालावधीत वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाजू मजबूत राहण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो आणि नोकरी-व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल.
 
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नव्या संधी दार ठोठावतील.
 
धनु राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल असून समाजात प्रतिमा उंचावेल.
 
कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नवाढीचे नवे मार्ग सापडू शकतात. परदेशाशी संबंधित संधी किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे.
 
दुसरीकडे, मेष राशीच्या लोकांवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. थकवा आणि चिडचिड जाणवू शकते. वैयक्तिक नात्यांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी संयम आवश्यक ठरेल.
 
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खर्चिक ठरू शकतो. अचानक येणाऱ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते. तसेच काही विरोधक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
 
वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. पचनाशी संबंधित त्रास किंवा प्रवासादरम्यान अडचणी संभवतात. कायदेशीर बाबींमध्ये विलंब होऊ शकतो.
 
मीन राशीच्या लोकांना मानसिक अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मोठे आर्थिक धोके टाळलेलेच योग्य ठरेल.
 
मिथुन, कर्क, तूळ आणि मकर या राशींसाठी हा आठवडा साधारण स्वरूपाचा राहील. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते.
 
डिसेंबरच्या शेवटी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आर्थिक स्थैर्यासाठी सूर्यपूजन आणि गरजूंना मदत केल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मानसिक शांततेसाठी मंत्रजप करून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्याचा सल्ला ज्योतिषतज्ज्ञ देत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0