: मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीची अधिकृत घोषणा
Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा राजकीय स्फोट झाला आहे. अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर राज ठाकरे (Thackeray) आणि उद्धव ठाकरे अखेर एकाच व्यासपीठावर आले असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवत, मुंबईवरील मराठी वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी थेट लढ्याची घोषणा केली आहे.
ही केवळ निवडणूक आघाडी नसून, दिल्लीकेंद्रित सत्तेला दिलेले थेट आव्हान असल्याचा ठाम सूर दोन्ही नेत्यांच्या भाषणातून उमटला. “मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार,” हा स्पष्ट संदेश या युतीतून देण्यात आला.
युतीच्या घोषणेनंतर खासदार संजय राऊत यांनी वातावरण तापवत हा दिवस मराठी इतिहासातील टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीप्रमाणेच आज मराठी समाज पुन्हा एकदा एकत्र आला असून, या युतीच्या जोरावर मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भगव्याचा झेंडा फडकवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रचंड हल्लाबोल करत थेट इशारा दिला.
“प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त, घाम आणि संघर्षातून मुंबई उभी केली. आज दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मुंबई खुपतेय. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचे डाव आखले जात आहेत. हे डाव आम्ही हाणून पाडू आणि मराठी माणसाची ताकद दाखवू,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीमागचा राजकीय अर्थ स्पष्ट करत सांगितले की,
“मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्रापेक्षा मोठं काहीच नाही.”राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका करत, ही युती सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.
“लढ्याची सुरुवात मुंबईपासून आहे. मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो ठाकरे बंधूंच्या युतीचाच असेल,” असा निर्धार राज ठाकरे यांनी ठामपणे जाहीर केला.
या घोषणेमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ अटळ मानली जात असून, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपसाठी मुंबईची लढाई अधिक कठीण होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.