राज्यात पुढील काही तास कडाक्याची थंडी; गारठा वाढण्याचा इशारा

24 Dec 2025 12:59:10
 
Severe Cold
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील हवामानात अचानक बदल होत असून अनेक भागांत थंडीची (Cold) तीव्रता वाढताना दिसत आहे. येत्या काही तासांत गारठा अधिक जाणवण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
 
कोकण पट्ट्यात थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. मुंबई आणि उपनगरांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात सुमारे १ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. मुंबईत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहणार आहे. नाशिक आणि जळगाव परिसरात शीतलहरी जाणवण्याची शक्यता असून सकाळी व रात्री थंडी अधिक बोचरी जाणवू शकते.
 
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचा प्रभाव कमी झाला होता, मात्र आता पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत आहेत. या विभागात किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
विदर्भातही थंडीचा जोर वाढत असून नागपूरमध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस गारवा कायम राहणार असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0