Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच दिवशी घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे सत्ताकेंद्रे आणि विरोधी पक्षांत मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी युतीची औपचारिक घोषणा केली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. थेट संबंध नसतानाही या दोन्ही घोषणा जवळपास एकाच वेळी झाल्याने राजकीय वर्तुळात त्याची विशेष चर्चा होत आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बळकट करण्यावर भर देण्यात आला. ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्यांना नियमिततेचा दिलासा देण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात सरकारने पाऊल टाकत धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कारभारात बदल घडवून आणण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय झाला असून, थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. यासाठी अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईच्या सत्तेसाठी निर्णायक ठरणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर एकत्र आल्या आहेत. वरळीतील ब्लू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. या वेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच असणार आणि तो आमचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. कोणतेही वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे सरकारचे महत्त्वाचे निर्णय, या दुहेरी घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.