मुंबईत भावनिक राजकारण चालणार नाही; शिवसेना-मनसे युतीवर बावनकुळेंचा प्रहार

24 Dec 2025 17:05:18
 
Bawankule
 Image Source:(Internet)
नागपूर :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यानेच या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सद्यस्थिती लपून राहिलेली नाही. कधीकाळी २२८ जागांवर सत्ता गाजवणारा पक्ष आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अवघ्या मोजक्या जागांवर सीमित झाला आहे. मुंबईतही यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत.”
 
युतीच्या घोषणेकडे उपरोधिक दृष्टिकोनातून पाहत ते म्हणाले,
 “राजकीय ताकद उरलेली नसताना युतीचा आधार घ्यावा लागतो. हा त्यांचा निर्णय आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो,” असा टोला त्यांनी लगावला.
 
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले की, मुंबईत भावनांवर नव्हे, तर विकासावरच मतदान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित मुंबई’ची ठोस संकल्पना मांडली असून, मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी स्पष्ट विकास आराखडा तयार आहे.
 
“फक्त ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून सहानुभूतीची लाट येईल, हा निव्वळ भ्रम आहे,” असे सांगत बावनकुळे यांनी विरोधकांवर पुन्हा हल्ला चढवला.
 
“संपूर्ण मुंबई महापालिकेत उमेदवार देण्याइतकी संघटनात्मक ताकदच त्यांच्याकडे नाही. कार्यकर्त्यांचा अभाव हीच त्यांची मोठी मर्यादा आहे,” असे ते म्हणाले.
 
भाजप आणि महायुतीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करत बावनकुळे यांनी सांगितले की,
“मुंबईचा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. मुंबईकर भावनिक सापळ्यात अडकणार नाहीत, तर विकासाच्या बाजूने ठाम भूमिका घेतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0