Image Source:(Internet)
मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची दाट शक्यता आहे.
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसत असून दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. विशेष म्हणजे या फोटोसोबत संजय राऊत यांनी फक्त “उद्या १२ वाजता” असे कॅप्शन दिले आहे. या एका ओळीमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींची चर्चा रंगली आहे.
राज–उद्धव ठाकरे यांची युती प्रत्यक्षात येणार असल्याचे संकेत या ट्विटमधून मिळत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला-
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मराठी मतांचे एकत्रीकरण साधण्याच्या उद्देशाने हा राजकीय प्रयोग केला जात असल्याचे बोलले जात आहे.
दादर, माहीम, शिवडी आणि परळ यांसारख्या मराठीबहुल भागांमध्ये दोन्ही पक्षांना समसमान प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. प्राथमिक चर्चेनुसार, शिवसेना (UBT) सुमारे १४० ते १५० जागांवर, तर मनसे ६० ते ७० जागांवर उमेदवार उभे करू शकते.
उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान, मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवार, २४ डिसेंबरपासून अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
उमेदवारांना ३० डिसेंबर २०२५ पर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर २ जानेवारी २०२६ ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
राज–उद्धव ठाकरे युतीची अधिकृत घोषणा उद्या होत असल्यास, येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.