Image Source:(Internet)
मुंबई:
आगामी बीएमसी (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले असून, काँग्रेसने उत्तर भारतीय मतदारांना केंद्रस्थानी ठेवत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने रविवारी सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करत फेरीवाले, स्थलांतरित कामगार, स्वयंरोजगार, धार्मिक-सांस्कृतिक सुविधा आणि पायाभूत सोयींसंदर्भात ठोस आश्वासने दिली आहेत.
मालाड येथील शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात हा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करत, उत्तर भारतीय समाजाच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
जाहीरनाम्यात फेरीवाला धोरणावर विशेष भर देण्यात आला असून, ‘स्मार्ट व्हेंडिंग’ संकल्पना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. टाउन व्हेंडिंग कमिटीच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेणे, पात्र फेरीवाल्यांना डिजिटल परवाने देणे, तसेच त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा काँग्रेसचा दावा आहे.
ऑटो-टॅक्सी चालकांसाठी सीएनजी पंपांची संख्या वाढवणे, विश्रांती केंद्रे उभारणे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचाही जाहीरनाम्यात समावेश आहे.
उत्तर भारतीय समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन छठ पूजा आणि दिवाळी सणासाठी विशेष सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कायमस्वरूपी छठ घाट, विसर्जन तलाव, महिलांसाठी सुरक्षित कपडे बदलण्याच्या खोल्या, समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक व्यवस्था तसेच रेल्वे स्थानकांबाहेर स्वस्त दरात जेवण मिळणारी मोठी प्रतीक्षालये उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल असे ‘प्रवासी भवन’ उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनी भाजपवर हल्लाबोल करत देशातील सामाजिक सलोखा ढासळल्याचा आरोप केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसने नेहमीच उत्तर भारतीय समाजाला नेतृत्वाची संधी दिल्याचे सांगितले, तर भाजप केवळ मतांसाठी राजकारण करत असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी भाजप युतीविरोधात समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले.
‘संवाद उत्तर भारतीय से – मुद्द्यांवर चर्चा’ या उपक्रमातून समाजाच्या समस्या ऐकून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती अधिवक्ता अवनीश तीर्थराज सिंह यांनी दिली. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हा जाहीरनामा उत्तर भारतीय मतदारांमध्ये कितपत प्रभाव टाकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.