Image Source:(Internet)
नागपूर :
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदिर १ जानेवारी २०२६ पासून भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामे आणि संरचनात्मक दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाच्या नव्या विकास आराखड्यानुसार, मुख्य मंदिरातील सभामंडपाचे नूतनीकरण तसेच परिसरातील आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. भाविकांची सुरक्षितता आणि भविष्यातील सोयी-सुविधा लक्षात घेऊनच मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या सुट्ट्यांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने, कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी १ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी या कालावधीपूर्वी दर्शनाची योजना करावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.