विजयानंतरही जल्लोष केला नाही;मालवण निकालावर निलेश राणेंची स्पष्ट भूमिका

22 Dec 2025 17:08:36
 
Nilesh Rane
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मालवणमधील निकालावर आपली भूमिका मांडली आहे. या यशामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाम पाठिंबा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा विजय साध्य झाल्याचा त्यांनी उल्लेख केला.
 
निलेश राणे यांनी सांगितले की, निकालानंतर त्यांनी कोणताही आनंदोत्सव साजरा केला नाही. कणकवली आणि मालवण परिसरातील राजकीय घडामोडींमुळे कुटुंबात भावनिक स्थिती निर्माण झाली होती. वडील म्हणून नारायण राणे यांच्यासाठी दोन्ही बाजू समान असल्याने, ते एका बाजूचा उघडपणे आनंद व्यक्त करू शकले नसते. त्यामुळेच आपण विजयाचा जल्लोष टाळल्याचे निलेश राणे म्हणाले.
 
नारायण राणे यांची राजकीय जाण आणि दूरदृष्टी अधोरेखित करताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेना आणि भाजपने महायुती म्हणून एकत्र लढावे, ही त्यांची कायमची इच्छा राहिली आहे. असं झालं असतं तर अनेक राजकीय अडथळे आणि कुटुंबातील अडचणी टाळता आल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
यावेळी त्यांनी योग्य नेतृत्वाला वेळेत संधी देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. एकजूट आणि योग्य दिशा असल्यास राजकारणात यश नक्कीच मिळू शकते, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला.
 
Powered By Sangraha 9.0