धनंजय मुंडेंना मारण्याचा प्रयत्न झाला होता? रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

02 Dec 2025 23:18:36
 
Ratnakar Gutte on attempt to kill Dhananjay Munde
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी केलेल्या दाव्यामुळे वातावरण तापले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि दिवंगत भय्यूजी महाराज यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे प्राण वाचले, असा थरारक आरोप गुट्टे यांनी उघड सभेत केला.
 
अलीकडेच धनंजय मुंडे गंगाखेड येथे राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते. या मंचावर मुंडे यांनी गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलल्याचा आरोप करत टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर गुट्टे यांनीही पलटवार करत विरोधकांना कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले.
 
गुट्टे म्हणाले, “माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली गेली, तरी गंगाखेडकरांनी मला भरघोस मतांनी विजयी केले. मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ शकतो, पण धनंजय मुंडे यांचा राजकीय निकाल मीच ठरवणार.”
 
यानंतर त्यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, “मुंडेंवर इंदूरमध्ये हत्या करण्याची योजना आखली होती. मात्र भय्यूजी महाराजांनी त्यांच्या हस्तक्षेपातून त्यांना वाचवलं.”
 
शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नावरही त्यांनी सफाई देत सांगितले की गंगाखेड साखर कारखान्याचे कर्ज पूर्ण फेडले गेले असून कोणत्याही शेतकऱ्याच्या नावावर थकबाकी नाही. जर काहींना सिबिलच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर त्यावरही मदत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0