मालवणमध्ये निवडणुकीच्या आदल्या रात्री हायव्होल्टेज ड्रामा; भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड, निलेश राणेंचा पोलीस ठाण्यात ठिय्या

02 Dec 2025 11:42:55
 
Nilesh Rane
 Image Source:(Internet)
मालवण :
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानाच्या एक दिवस आधी मालवणमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. मध्यरात्री झालेल्या नाकाबंदीत पोलिसांना एका कारमधून सुमारे दीड लाखांची रोकड आढळून आली. तपासात ही कार देवगड भाजपचे (BJP) तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या मालकीची असल्याचे उघडकीस आले.
 
या प्रकरणानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले. त्यांनी भाजपकडून निवडणूक जवळ आली की पैसे वाटप सुरू होते, असा गंभीर आरोप करत थेट मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली. “जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही,” असा पवित्रा राणेंनी घेतल्याने पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
रात्री 12.10 च्या सुमारास रोकडसह कार पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती. पण कारवाई न झाल्याचा आरोप करीत राणे पोलीस ठाण्यात पोहोचताच त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या मते, ते पोहोचताच निवडणूक अधिकारीही ठाण्यात दाखल झाले. दरम्यान, प्रकरण ‘मिटवण्यासाठी’ भाजपचे काही पदाधिकारी ठाण्यात आल्याचा आरोपही राणेंनी केला.
 
त्यांनी सांगितले की, जे लोक कार मालकांसाठी पोलीस ठाण्यात आले होते, त्यांच्या वाहनालाही नंबरप्लेट नव्हती; मात्र गाडीत भाजपचा गमछा दिसून येत होता. त्यामुळे त्या वाहनावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
 
मालवणमधील निलेश राणे विरुद्ध भाजप असा सुरू असलेला वाद या घटनेनंतर आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0